Thursday, April 10, 2025

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर

 

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर

 

बरीच वर्षे हा प्रवास केला, सतत निरंतर थकता

आयुष्यात स्वप्नांची शिदोरी बांधत चालता चालता

वाटेत शिदोरीतून काही स्वप्ने घरंगळून फुटली

धारातीर्थी झालेल्यांच्या जागी नवीन स्वप्ने बांधली

परंतु कधी ना हिम्मत हारली ना जिद्द सोडली

 

कधी खाच खळग्यात गटांगळ्या खाल्ल्या

कधी उंच पर्वत गाठून उल्हासीत झालो

आभाळ ठेंगणं झाल्याच्या गुदगुल्या झाल्या

तेव्हाच तेथून धरणीच्या मिठीत आलो

 

आता आयुष्याच्या ह्या टप्यावर उभा आहे

मागे वळून बघितले तर कधी स्वतःवरच हसू येते

तर काही आठवणी डोळे ओलेचिंब करतात

शिदोरीतील काही अपूर्ण स्वप्नांनी प्राण सोडलेत

तर काहींनी तग धरून उजेडाची आस धरलीय

 

निवृत्ती हा आयुष्याच्या उत्तरार्धाचा आरंभ,

शेवट नसून जीवनाच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ.

नवा ताजातवाना जोम, हुरूप, जोश एकत्र करण्याचा,

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरून नवीन सूर्योदय बघण्याचा.

No comments:

Post a Comment