सोमवारचा दिवस, सकाळी ९ चा सुमार होता. स्वस्तिक इस्पितळात नेहमीपेक्षा आज जरा जास्तच गजबज होती. दर सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस म्हणून तशी असतेच. स्टाफ साठी ते काही नवल नव्हते परंतु प्रतीक थोडा बावरून गेला होता. आज तो प्रथमच पंधराव्या मजल्यावर आईला घेऊन आला होता. त्याच्या आईची म्हणजे कुसुमताईंची केमोथेरपीची दुसरी अपॉइंटमेंट होती.
स्वस्तिक इस्पितळाचा स्वतःचा असा एक अजब रुबाब होता. शहराच्या मध्यभागी वसलेले, संपूर्ण वातानुकूलित, एकवीस मजल्यांचे उंच, तसेच पसारा एव्हढा मोठा होता कि असलेल्या वीस लिफ्ट्ससुद्धा कमी पडत होत्या. इस्पितळात प्रवेश केल्यावर वाटेल कि हे पंचतारांकित हॉटेल आहे कि इस्पितळ? त्यात विशाल असे फूड कोर्ट, गिफ्ट शॉप, तसेच बाहेरगावच्या लोकांना राहण्यासाठी पंचतारांकित खोल्यासुद्धा होत्या. एकंदरीत रुतबाच खूप मोठा!!
त्यांचे कँसर सेंटर उपचारांसाठी खूप प्रसिद्ध होते. मोठमोठ्या हस्तींचे कॅन्सर तिथे बरे करण्यात आले होते.
कुसुमताईंना दोन महिन्यापूर्वी काखेत दोन मोठ्या गाठी आढळल्या. डॉक्टरांनी निष्कर्ष लावला कि त्या गाठी कॅन्सरच्या असून इलाज म्हणून सहावेळा केमोथेरपीची ट्रीटमेंट करावी लागेल. पहिल्या केमोच्या वेळी त्यांना तीन दिवस इस्पितळात राहावे लागेल आणि नंतरच्या पाच केमो इस्पितळाच्या 'डे केयर' मध्ये, प्रत्येकी तीन आठवड्यांच्या अंतराने दिल्या जातील. 'डे केयर' म्हणजे तिथे पेशंट फक्त एका दिवसासाठी राहू शकतो. सकाळी यायचे केमोथेरपी घ्यायची आणि दुपारी किंवा संध्याकाळी जशी ती संपेल तसे निघायचे. डे केयरचे डिपार्टमेंट पंधराव्या मजल्यावर होते.
कुसुमताईंची पहिली
केमो तीन आठवड्यापूर्वीच झाली होती. आज त्यांची दुसऱ्या केमोची अपॉइंटमेंट होती.
मुलाला म्हणजे प्रतीकला घेऊन सकाळी नऊ वाजताच त्या इस्पितळात हजर झाल्या. प्रतिकने फॉर्म, पैसे भरायच्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या व आईला घेऊन पंधराव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट पकडली.
डे केयर एकदम स्वच्छ व नीट नेटके होते. दहा एक मोठ्या खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत सहा बेड्स व्यवस्थित अंतरावर एका बाजूला तीन तर समोरच्या बाजूला तीन असे मांडले होते. पेशंटला प्रायव्हसी मिळण्यासाठी प्रत्येक बेडला चारही बाजूनी सरकते पडदे लावले होते. दोन टॉयलेट्स सुद्धा होत्या. एकंदरीत सर्व व्यवस्थित व मनाला दिलासा देणारे होते.
कुसुमताईंना खोली नंबर १५०१ मध्ये पाठवण्यात आले. तेव्हा खोलीत कोणीच नव्हते म्हणून त्यांना मनासारखा पाहिजे तो बेड मिळाला. डॉक्टर साडे दहा वाजता येणार होते व त्यानंतर केमोथेरपी सुरु होणार होती.
इतक्यात खोलीत एक पन्नाशीची बाई आली. सुधृद तसेच सुसंकृत, घरंदाज दिसत होती. व्यवस्थित नेसलेली साडी, गळ्यात जाड सोन्याचे मंगलसूत्र, कपाळावर गोल मोठे कुंकू. एकदम सराईतासारखी खोलीभर फिरली, टॉयलेट मध्ये जाऊन सगळे बघितले. एका दोघा नर्सेसना वरच्या आवाजात नावाने हाक मारली. दोघ्या तिघ्या नर्सेस धावत पळत आल्या, तिला बघून खुश झाल्या व गप्पा मारू लागल्या. त्या सगळ्या इस्पितळाच्या गॉसिप मध्ये मग्न झाल्या. ताज्या अपडेटची देवाण घेवाण सुरु झाली.
गप्पांच्या ओघात त्या बाईचे नाव राधा आहे हे कळले. बोलत बोलत राधा एका खिडकीच्या कडेवर टेकून बसली आणि बाकी सगळ्या तिच्या आजूबाजूला उभ्या राहिल्या. ज्या गप्पा चालल्या होत्या त्यावरून राधा युनिअन लीडर वाटत होती. एकदम कडक आवाजात सगळ्यांशी बोलत होती व बाकी सगळ्या आपापल्या व्यथा तिच्या समोर मांडत होत्या.
प्रतीकला आधी वाटले कि त्यांच्या मोठ्या आवाजात बोलण्याची तक्रार करावी. परंतु त्याने विचार केला कि स्टाफशी कशाला पंगा घ्या, नंतर दिवसभर त्याच बायका आईची देखभाल करणार होत्या. कुसुमताईंनी सुद्धा डोळे वटारून त्याला गप्प राहण्याचा इशारा दिला आणि त्यात आत्तापर्यंत आलेले पेशंट तर काहीच बोलत नव्हते तर आपण कशाला बोलावे? म्हणून तो गप्प सगळे बघत बसला होता.
थोड्या वेळाने त्या सगळ्या गेल्या पण राधा मात्र काहीश्या गंभीर विचारात मग्न होऊन खिडकीच्या कडेवरच बसून राहिली.
पाच एक मिनिटं झाली असतील, तेव्हढ्यात राधाचा फोन वाजला आणि ती दचकली जणू काही तिची समाधीच भंग पावली. फोन उचलल्या उचलल्याच समोरच्याला जोर जोरात ओरडू लागल्या. थोडी बोलाचाली झाल्यावर तिने पलीकडच्याला एकदम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
इकडे प्रतीक व कुसुमताई एकदम चरकलेच. आता राधा त्यांना युनिअन लीडर सोडून कुठल्या तरी टोळीची म्होरकी वाटायला लागली. रस्त्यांचा खड्ड्यांचे सुधारीकरण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन असावा. सगळ्या गल्ल्यांची नावे घेत त्यावरील खड्ड्यांची संख्या सांगत खूप झापले त्याला.
तो फोन ठेवल्यावर राधाने पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्यांना सुद्धा मोठमोठयाने ओरडू लागल्या. “इकबालची गुंडगिरी खूप वाढली आहे भावे नगर मध्ये. नागरिकांनी अजून किती तक्रारी करायच्या तेव्हा तुम्हाला जाग येणार? तुम्हाला पैसे देऊन गप्प केलेय कि तुम्हालाही त्याची भीती वाटते? नक्की काय ते सांगा नाही तर मलाच येऊन त्याला संपवायला लागेल. वेळ पडली तर त्याचा काटा काढायलाही मागे पुढे बघणार नाही. मग बसा तुम्ही पंचनामे करत. मला फरक नाही पडत. अगोदरच माझ्यावर सहा केसेस कोर्टात लागल्या आहेत त्यात सातवीची भर पडेल. पण मी कोणाची गुंडगिरी खपवून घेणार नाही. खून करून टाकेन त्याचासुद्धा.”
इकडे प्रतिकने न राहवून खोलीच्या बाहेर जाऊन स्टाफशी चौकशी केली कि ह्या राधाबाई कोण आहेत. सगळ्यांनी हळू आवाजात त्याला बजावले कि तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस आणि काही बोलायला तर बिलकुल जाऊ नकोस. एकदम टेरर बाई आहे ती. मोठमोठे गुंड तिला बघून थरथर कापतात, म्हणतात एकवेळ मृत्यूचा मुकाबला करणे सोपे आहे पण ह्या बाईचा सामना करणे नको.
प्रतीक गपचूप येऊन आईच्या बेडच्या बाजूला येऊन राधा कडे पाठ फिरवून बसला. मनात म्हणाला ह्या बाईपासून लांबच राहिलेले बरे. तसेच स्वतःच्या पाठी काय कमी व्याप नाहीत. आधीच तो कुसुमताईंच्या आजाराला घाबरलेला होता.
इतक्यात राधाने एका नर्सला ओरडून पाणी आणायला सांगितले. ती सुद्धा दबकतच पाणी देऊन गेली. थोडी शांतता झाली. प्रतीकला वाटले आता राधा निघून जाईल आपल्या ड्युटीवर, पण ती काही हलेना.
थोड्या वेळाने म्हणजे पंधरा मिनिटानंतर डॉक्टर खोलीत आले. समोरच त्यांना राधा दिसली व तसेच ते तिच्यापाशी जायला लागले. राधाने सुद्धा जसे त्यांना बघितले तसेच खिडकीजवळच्या बेड वर झेप घेतली व स्वतःवर चादर ओढली.
डॉक्टर मिश्किलीने बोलले, "काय राधाताई कशी आहे तब्येत?"
डॉक्टरांच्या ह्या प्रश्नाने खोलीतील पेशंट्सना कळले कि राधासुद्धा एक पेशंट आहे. त्यांच्यासाठी हे कळणे सुद्धा एक धक्काच होता. म्हणजे राधाला सुद्धा कॅन्सर झाला होता!
राधा हळू आवाजात बोलली कि अधून मधून पोटात दुखते, बाकी ठीक आहे.
डॉक्टर म्हणाले, "दिसतेच आहे. एव्हढ्या जोरात सगळ्यांची झाडंपट्टी चालू आहे तुमची सकाळ पासून. मला सगळं रिपोर्टींग होते. तिसरी केमो आहे ना आज? पण तुमचे खणखणीत झापणे काही कमी झाले नाही."
राधा सकाळपासून पहिल्यांदाच ओशाळल्याचे सर्व पेशंट्सनी बघितले. तिचे हे रूप सर्वानाच नवे होते.
डॉक्टर म्हणाले, "राधाताई, किडनीच्या कॅन्सरला बरा करायला थोडा वेळ लागतोच. औषधे ठरवलेल्या वेळात न चुकता घेत राहा. आहारातील तिखट आणि अल्कोहोल एकदम थांबवा. काही काळजी करू नका. लवकरच बऱ्या व्हाल तुम्ही."
त्यावर राधा विचलित होऊन म्हणाली, "हे सगळे बरोबर आहे डॉक्टर, पण जीवाची खूप भीती वाटते हो!!"
👍
ReplyDelete