माझा आनंद गेला, जणू आयुष्यातला आनंदच हरवला,
माझ्या कुशीत वाढलेला, आज अनंतात भुर्रकन उडाला.
माझ्या आयुष्यात पदार्पण करून,
माझे आई बनायचं स्वप्न साकारलंस.
पण आज तूच असे अचानक जाऊन,
का रे, मला असे अधांतरी सोडलंस?
मी आता कोणाला दटावणार?
व माझ्यावर कोण ओरडणार?
आपले प्रेमाचे ओरडणे झगडणे,
सारेच कसे अचानक इतिहास झाले.
गाढ झोपेत तुझ्या हसण्याचा आवाज येतो.
मन प्रसन्न होते, चेहेर्यावर कळी फुलते.
नेमका तेव्हाच माझा हुंदका घात करतो,
झोप मोडते आणि त्याक्षणीच स्वप्न तुटते.
तू सोडून गेलास जणू माझे अस्तित्वच शून्य झाले,
पण मी अजूनही आईच आहे, तुझीच आई आहे.
तुझ्या आठवणींतच अजून तुझे अस्तित्व जपतेय,
त्याच ऊर्जेने उर्वरित आयुष्याचे दिवस पुढे रेटतेय.
आभाळाकडे बघूत आक्रोशून विचारते,
माझा नंदा मला परत कधी भेटेल?
परंतु सर्वत्र निःशब्द शांतताच पसरते,
ऐकू येतात ते फक्त घरंगळणारे अश्रू.
तेव्हा उमजते माझा आनंद गेला,
जणू आयुष्यातला आनंदच हरवला
No comments:
Post a Comment