Thursday, May 29, 2025

प्रिय आईस

पोटच्या मुलांना आभाळाएव्हढे प्रेम दिलंस

आमचे अश्रू स्वतःच्या डोळ्यात साठवलेस

परंतु आमचे डोळे ओले होऊ दिले नाहीस

स्वतः झिजलिस आणि आम्हाला फुलवलेस


वयोमानाने आता थकलीस तू, असे वाटते 

तरी डोळ्यातील माया अजून तशीच भासते 

मनातील प्रेमाचा जोश व शरीरातील ताकद 

दोघांचाही विरुद्ध दिशेने चालू आहे प्रवास


आजही समोर आल्यावर उत्साहाने उठतेस 

थोड्याच वेळाने ताकद नाही म्हणून बसतेस 

जेव्हा हे सर्व मी बघतो माझ्या डोळ्यासमोर

तेव्हा अनाहूत वाहू लागतात मनात अश्रू झरझर 


तुझ्याशिवाय जीवन, जणू एक रिकामे अवकाश 

तुझ्या अस्तित्वातच घडले माझे अस्तित्व सावकाश 

तुझ्या प्रेमाच्या रोपट्यातून फुललेले मी एक फुल 

पण मनात रोज फुलतं आई तुझ्याच कृतज्ञतेचं फूल


Sunday, May 4, 2025

असेच अचानक वादळ आलं

 

असेच अचानक वादळ आलं,

वृक्षाची एक फांदी कोलमडली.

फांदीवरचे आपलं घरटं थरारलं,

क्षणात सारी स्वप्ने भरकटली.

 

अंधाराने मला संपूर्ण घेरलं होतं.

आजूबाजूला चाचपडलं तर फक्त

माझी दोन बाळे मला बिलगून होती,

बाकी सारं दूरपर्यंत धुरसटच होतं

 

घरट्यातील पणतीची ज्योत विजली होती,

सारे बळ एकवटून एक दृढनिश्चय केला.

डगमगायचे नाही, हार नाही मानायची,

मनाशी चंग बांधला उजेड तेजत ठेवला.

 

बाळांनो, धीरगंभीर समस्या समोर होती,

नियती जणू काही माझी परीक्षा घेत होती.

निराधार होते तरी तुम्हाला आधार देता देता,

आपोआप स्वतःला आधार मिळत होता.

 

सबळ समर्थ स्वकीयांनी हात पुढे केला,

परिस्थितीशी झुंजत लढत मार्ग काढला.

वाटेत कधी गारवा तर कधी झळ लागली,

पण त्या चटक्यांपासून तुम्हाला दूर ठेवली.

 

स्वमेहनतीने तुम्ही आता सक्षम सबळ झालात,

पण वयोमानानुसार स्वकीय थोडे दुर्बळ होत आहेत.

कालपर्यंत त्यांनी दिलेल्या आधाराला ठेवून माझ्या लक्षात,

आज त्यांच्या आधाराची काठी बनणे हेच माझ्या ध्यानात.

Wednesday, April 16, 2025

जणू आयुष्यातला आनंदच हरवला

(आपला थोरला मुलगा आनंद अचानक गेला त्या आईच्या मनातल्या भावना) 

माझा आनंद गेला, जणू आयुष्यातला आनंदच हरवला, 
माझ्या कुशीत वाढलेला, आज अनंतात भुर्रकन उडाला. 

 माझ्या आयुष्यात पदार्पण करून, 
 माझे आई बनायचं स्वप्न साकारलंस. 
पण आज तूच असे अचानक जाऊन, 
का रे, मला असे अधांतरी सोडलंस? 

मी आता कोणाला दटावणार? 
व माझ्यावर कोण ओरडणार? 
आपले प्रेमाचे ओरडणे झगडणे, 
सारेच कसे अचानक इतिहास झाले. 

गाढ झोपेत तुझ्या हसण्याचा आवाज येतो. 
मन प्रसन्न होते, चेहेर्यावर कळी फुलते. 
नेमका तेव्हाच माझा हुंदका घात करतो, 
झोप मोडते आणि त्याक्षणीच स्वप्न तुटते. 

तू सोडून गेलास जणू माझे अस्तित्वच शून्य झाले, 
पण मी अजूनही आईच आहे, तुझीच आई आहे. 
तुझ्या आठवणींतच अजून तुझे अस्तित्व जपतेय, 
त्याच ऊर्जेने उर्वरित आयुष्याचे दिवस पुढे रेटतेय. 

आभाळाकडे बघूत आक्रोशून विचारते, 
माझा नंदा मला परत कधी भेटेल? 
परंतु सर्वत्र निःशब्द शांतताच पसरते, 
ऐकू येतात ते फक्त घरंगळणारे अश्रू. 

तेव्हा उमजते माझा आनंद गेला, 
जणू आयुष्यातला आनंदच हरवला

Thursday, April 10, 2025

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर

 

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर

 

बरीच वर्षे हा प्रवास केला, सतत निरंतर थकता

आयुष्यात स्वप्नांची शिदोरी बांधत चालता चालता

वाटेत शिदोरीतून काही स्वप्ने घरंगळून फुटली

धारातीर्थी झालेल्यांच्या जागी नवीन स्वप्ने बांधली

परंतु कधी ना हिम्मत हारली ना जिद्द सोडली

 

कधी खाच खळग्यात गटांगळ्या खाल्ल्या

कधी उंच पर्वत गाठून उल्हासीत झालो

आभाळ ठेंगणं झाल्याच्या गुदगुल्या झाल्या

तेव्हाच तेथून धरणीच्या मिठीत आलो

 

आता आयुष्याच्या ह्या टप्यावर उभा आहे

मागे वळून बघितले तर कधी स्वतःवरच हसू येते

तर काही आठवणी डोळे ओलेचिंब करतात

शिदोरीतील काही अपूर्ण स्वप्नांनी प्राण सोडलेत

तर काहींनी तग धरून उजेडाची आस धरलीय

 

निवृत्ती हा आयुष्याच्या उत्तरार्धाचा आरंभ,

शेवट नसून जीवनाच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ.

नवा ताजातवाना जोम, हुरूप, जोश एकत्र करण्याचा,

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरून नवीन सूर्योदय बघण्याचा.

Saturday, September 17, 2022

पण जीवाची खूप भीती वाटते हो !

सोमवारचा दिवस, सकाळी ९ चा सुमार होता.  स्वस्तिक इस्पितळात नेहमीपेक्षा आज जरा जास्तच गजबज होती.  दर सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस म्हणून तशी असतेच. स्टाफ साठी ते काही नवल नव्हते परंतु प्रतीक थोडा बावरून गेला होता.  आज तो प्रथमच पंधराव्या मजल्यावर आईला घेऊन आला होता.  त्याच्या आईची म्हणजे कुसुमताईंची केमोथेरपीची दुसरी अपॉइंटमेंट होती. 

स्वस्तिक इस्पितळाचा स्वतःचा असा एक अजब रुबाब होता.  शहराच्या मध्यभागी वसलेले, संपूर्ण वातानुकूलित,  एकवीस मजल्यांचे उंच, तसेच पसारा एव्हढा मोठा होता कि असलेल्या वीस लिफ्ट्ससुद्धा कमी पडत होत्या.  इस्पितळात प्रवेश केल्यावर वाटेल कि हे पंचतारांकित हॉटेल आहे कि इस्पितळ? त्यात विशाल असे फूड कोर्ट,  गिफ्ट शॉप, तसेच बाहेरगावच्या लोकांना राहण्यासाठी पंचतारांकित खोल्यासुद्धा होत्या. एकंदरीत रुतबाच खूप मोठा!!

त्यांचे कँसर सेंटर उपचारांसाठी खूप प्रसिद्ध होते.  मोठमोठ्या हस्तींचे कॅन्सर तिथे बरे करण्यात आले होते.

कुसुमताईंना दोन महिन्यापूर्वी काखेत दोन मोठ्या गाठी आढळल्या. डॉक्टरांनी निष्कर्ष लावला कि त्या गाठी कॅन्सरच्या असून इलाज म्हणून सहावेळा केमोथेरपीची ट्रीटमेंट करावी लागेल.  पहिल्या केमोच्या वेळी त्यांना तीन दिवस इस्पितळात राहावे लागेल आणि नंतरच्या पाच केमो इस्पितळाच्या 'डे केयर' मध्ये, प्रत्येकी तीन आठवड्यांच्या अंतराने दिल्या जातील.  'डे केयर' म्हणजे तिथे पेशंट फक्त एका दिवसासाठी राहू शकतो.  सकाळी यायचे केमोथेरपी घ्यायची आणि दुपारी किंवा संध्याकाळी जशी ती संपेल तसे निघायचे. डे केयरचे डिपार्टमेंट पंधराव्या मजल्यावर होते.

कुसुमताईंची पहिली केमो तीन आठवड्यापूर्वीच झाली होती.  आज त्यांची दुसऱ्या केमोची अपॉइंटमेंट होती.

मुलाला म्हणजे प्रतीकला घेऊन सकाळी नऊ वाजताच त्या इस्पितळात हजर झाल्या. प्रतिकने फॉर्म, पैसे भरायच्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या व आईला घेऊन पंधराव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट पकडली. 

डे केयर एकदम स्वच्छ व नीट नेटके होते.  दहा एक मोठ्या खोल्या होत्या.  प्रत्येक खोलीत सहा बेड्स व्यवस्थित अंतरावर एका बाजूला तीन तर समोरच्या बाजूला तीन असे मांडले होते.  पेशंटला प्रायव्हसी मिळण्यासाठी प्रत्येक बेडला चारही बाजूनी सरकते पडदे लावले होते.  दोन टॉयलेट्स सुद्धा होत्या.   एकंदरीत सर्व व्यवस्थित व मनाला दिलासा देणारे होते.

कुसुमताईंना खोली नंबर १५०१ मध्ये पाठवण्यात आले.  तेव्हा खोलीत कोणीच नव्हते म्हणून त्यांना मनासारखा पाहिजे तो बेड मिळाला.  डॉक्टर साडे दहा वाजता येणार होते व त्यानंतर केमोथेरपी सुरु होणार होती.

इतक्यात खोलीत एक पन्नाशीची बाई आली. सुधृद तसेच सुसंकृत, घरंदाज दिसत होती.  व्यवस्थित नेसलेली साडी, गळ्यात जाड सोन्याचे मंगलसूत्र, कपाळावर गोल मोठे कुंकू. एकदम सराईतासारखी खोलीभर फिरली, टॉयलेट मध्ये जाऊन सगळे बघितले.  एका दोघा नर्सेसना वरच्या आवाजात नावाने हाक मारली. दोघ्या तिघ्या नर्सेस धावत पळत आल्या, तिला बघून खुश झाल्या व गप्पा मारू लागल्या. त्या सगळ्या इस्पितळाच्या गॉसिप मध्ये मग्न झाल्या. ताज्या अपडेटची देवाण घेवाण सुरु झाली.

गप्पांच्या ओघात त्या बाईचे नाव राधा आहे हे कळले. बोलत बोलत राधा एका खिडकीच्या कडेवर टेकून बसली आणि बाकी सगळ्या तिच्या आजूबाजूला उभ्या राहिल्या.  ज्या गप्पा चालल्या होत्या त्यावरून राधा युनिअन लीडर वाटत होती.  एकदम कडक आवाजात सगळ्यांशी बोलत होती व बाकी सगळ्या आपापल्या व्यथा तिच्या समोर मांडत होत्या.

प्रतीकला आधी वाटले कि त्यांच्या मोठ्या आवाजात बोलण्याची तक्रार करावी.  परंतु त्याने विचार केला कि स्टाफशी कशाला पंगा घ्या, नंतर दिवसभर त्याच बायका आईची देखभाल करणार होत्या. कुसुमताईंनी सुद्धा डोळे वटारून त्याला गप्प राहण्याचा इशारा दिला आणि त्यात आत्तापर्यंत आलेले पेशंट तर काहीच बोलत नव्हते तर आपण कशाला बोलावे? म्हणून तो गप्प सगळे बघत बसला होता.

थोड्या वेळाने त्या सगळ्या गेल्या पण राधा मात्र काहीश्या गंभीर विचारात मग्न होऊन खिडकीच्या कडेवरच बसून राहिली.

पाच एक मिनिटं झाली असतील, तेव्हढ्यात राधाचा फोन वाजला आणि ती दचकली जणू काही तिची समाधीच भंग पावली.  फोन उचलल्या उचलल्याच समोरच्याला जोर जोरात ओरडू लागल्या.  थोडी बोलाचाली झाल्यावर तिने पलीकडच्याला एकदम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. 

इकडे प्रतीक व कुसुमताई एकदम चरकलेच.  आता राधा त्यांना युनिअन लीडर सोडून कुठल्या तरी टोळीची म्होरकी वाटायला लागली.  रस्त्यांचा खड्ड्यांचे सुधारीकरण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन असावा.  सगळ्या गल्ल्यांची नावे घेत त्यावरील खड्ड्यांची संख्या सांगत खूप झापले त्याला.

तो फोन ठेवल्यावर राधाने पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्यांना सुद्धा मोठमोठयाने ओरडू लागल्या.  “इकबालची गुंडगिरी खूप वाढली आहे भावे नगर मध्ये.  नागरिकांनी अजून किती तक्रारी करायच्या तेव्हा तुम्हाला जाग येणार?  तुम्हाला पैसे देऊन गप्प केलेय कि तुम्हालाही त्याची भीती वाटते?  नक्की काय ते सांगा नाही तर मलाच येऊन त्याला संपवायला लागेल.  वेळ पडली तर त्याचा काटा काढायलाही मागे पुढे बघणार नाही. मग बसा तुम्ही पंचनामे करत. मला फरक नाही पडत. अगोदरच माझ्यावर सहा केसेस कोर्टात लागल्या आहेत त्यात सातवीची भर पडेल.  पण मी कोणाची गुंडगिरी खपवून घेणार नाही. खून करून टाकेन त्याचासुद्धा.

इकडे प्रतिकने न राहवून खोलीच्या बाहेर जाऊन स्टाफशी चौकशी केली कि ह्या राधाबाई कोण आहेत.  सगळ्यांनी हळू आवाजात त्याला बजावले कि तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस आणि काही बोलायला तर बिलकुल जाऊ नकोस.  एकदम टेरर बाई आहे ती.  मोठमोठे गुंड तिला बघून थरथर कापतात, म्हणतात एकवेळ मृत्यूचा मुकाबला करणे सोपे आहे पण ह्या बाईचा सामना करणे नको.

प्रतीक गपचूप येऊन आईच्या बेडच्या बाजूला येऊन राधा कडे पाठ फिरवून बसला.  मनात म्हणाला ह्या बाईपासून लांबच राहिलेले बरे. तसेच स्वतःच्या पाठी काय कमी व्याप नाहीत. आधीच तो कुसुमताईंच्या आजाराला घाबरलेला होता.

इतक्यात राधाने एका नर्सला ओरडून पाणी आणायला सांगितले.  ती सुद्धा दबकतच पाणी देऊन गेली.  थोडी शांतता झाली.  प्रतीकला वाटले आता राधा निघून जाईल आपल्या ड्युटीवर, पण ती काही हलेना.

थोड्या वेळाने म्हणजे पंधरा मिनिटानंतर डॉक्टर खोलीत आले.  समोरच त्यांना राधा दिसली व तसेच  ते तिच्यापाशी जायला लागले.  राधाने सुद्धा जसे त्यांना बघितले तसेच खिडकीजवळच्या बेड वर झेप घेतली व स्वतःवर चादर ओढली.  

डॉक्टर मिश्किलीने बोलले, "काय राधाताई कशी आहे तब्येत?"

डॉक्टरांच्या ह्या प्रश्नाने खोलीतील पेशंट्सना कळले कि राधासुद्धा एक पेशंट आहे.  त्यांच्यासाठी हे कळणे सुद्धा एक धक्काच होता. म्हणजे राधाला सुद्धा कॅन्सर झाला होता!

राधा हळू आवाजात बोलली कि अधून मधून पोटात दुखते, बाकी ठीक आहे.

डॉक्टर म्हणाले, "दिसतेच आहे.  एव्हढ्या जोरात सगळ्यांची झाडंपट्टी चालू आहे तुमची सकाळ पासून.  मला सगळं रिपोर्टींग होते. तिसरी केमो आहे ना आज?  पण तुमचे खणखणीत झापणे काही कमी झाले नाही."

राधा सकाळपासून पहिल्यांदाच ओशाळल्याचे सर्व पेशंट्सनी बघितले. तिचे हे रूप सर्वानाच नवे होते.

डॉक्टर म्हणाले, "राधाताई, किडनीच्या कॅन्सरला बरा करायला थोडा वेळ लागतोच.  औषधे ठरवलेल्या वेळात न चुकता घेत राहा. आहारातील तिखट आणि अल्कोहोल एकदम थांबवा. काही काळजी करू नका.  लवकरच बऱ्या व्हाल तुम्ही."

त्यावर राधा विचलित होऊन म्हणाली, "हे सगळे बरोबर आहे डॉक्टर, पण जीवाची खूप भीती वाटते हो!!"

Thursday, January 3, 2019

शेंगदाणेवाला गणू


गणू  गडबडून जागा झालाघडाळ्यात बघितले तर संध्याकाळचे सहा वाजले होते.   त्याला बसल्या बसल्या कधी डोळा लागला तेच कळले नव्हतेदुपारी दोन वाजता जेवण्याच्या डब्ब्यांची डिलिव्हरी करून घरी आला होताभूक प्रचंड लागली होती व त्यातच सुगंधाने त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते. साहजीकच जेवण  जरा जास्त झाले.

त्याला खाडकन जाग आली पहिला सुगंधावर खेकसला, “मला उठवले का नाहीस तू?”

सुगंधा  म्हणाली, "अहो जरा तरी तुमच्या शरीराला आराम द्याकाल रात्री अकरा वाजता झोपलात आणी पहाटे एक वाजता उठून कंपनीत कामाला गेलातआता परत निघाल ते  रात्री अकरा वाजता परत यालमुद्दामच मी तुम्हाला नाही उठवलेकिती गाढ झोपला होता तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावर शांती दिसत होती.”

हे ऐकून गणु अजूनच चिडला.  “एवढेसुद्धा तुला कळत नाहीहायवेच्या सिग्नलवर एवढ्याना जण आलेसुद्धा असतीलआता मी पुड्या कधी बांधणार, पोहोचणार कधी आणी विकणार कधी?

गणु खूप मेहनती होताघरची परिस्थिती नाजूकच होतीशिक्षण वडील गेल्यानंतर सोडावे लागले होतेआईने हलकी फुलकी कामे करावी हे त्याला मान्य नव्हतेजे हाताला मिळेल ते छोटे मोठे काम  तो करू लागलादिवसातून १६ - १८ तास काम करायचाकाटकसर करीत, एकएक पैसा वाचवत आयुष्य रेटत होतापाच वर्षापूर्वी त्याला  मारुतीच्या शोरूमवर गुरख्याची नोकरी मिळाली होतीत्यानंतर एका वर्षात त्याचे सुगंधाबरोबर लग्न झाले आणी वर्षभरात एक मुलगा झालासुहास आता चार वर्षाचा झाला होता, एकदम गोंडस आणी चुणचुणीत होता.

घर खर्च वाढल्यामुळे गणूने मुद्दामहून शेठजींकडे रात्रपाळी मागून घेतलीरात्री ते सकाळी  १० तो शोरूमवर ड्युटी करायचा. घरी आल्यावर थोडावेळ झोपून लगेच जेवणाचे डब्बे पोहोचवायला जायचा तो दुपारी वाजेपर्यंत परत यायचामग जेवून झोपल्यावर च्या सुमारास उठून खाऱ्या शेंगदाण्याच्या पुड्या बांधून हायवेच्या सिग्नलवर साधारण वाजता पोहोचायचाऑफिसमधून निघालेले चाकरमानी, सिग्नलला ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली असताना टाइम पाससाठी शेंगदाणे विकत घेतात१० रुपयाला एक पुडी. रात्री वाजता परत जेवणाचे डब्बे पोहोचवायला तो मोकळा व्हायचाअसा त्याचा खडतर जीवनक्रम

आज त्याला उशीर झाला होतात्याच्या आधीच काही शेंगदाणे विकणारे आले असणार आज धंदा कमी होईल ह्या विचाराने तो त्रस्त झाला.

सुगंधा म्हणाली, ‘काही काळजी करू नका, मी पुड्या बांधल्या आहेतसुहासनेसुद्धा मदतीचा हात लावला आहे.”

गणूचे सुहासकडे लक्ष गेले आणी बघतो तर काय सुहास एका पुडीतील शेंगदाणे तोंडात कोंबत होता, त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव पसरले होतेशेंगदाणे कमी होत आहेत ह्या विचाराने गणु एकदम संतापला त्याने सुहासच्या हातातून खचकन पुडी हिसकावून घेतली आणी म्हणाला,”एवढेसुद्धा कळत नाही  हे दाणे विकण्यासाठी आहेत, तुझ्या खाण्यासाठी नाहीत.”

अचानक घरात शांतता पसरलीबिचाऱ्या निरागस सुहासला काही कळेना की त्याचे काय चुकले, त्याच्या चेहऱ्यावर हास्य लोपून भीती दाटलीत्याचा कावरा बावरा चेहरा बघून सुगंधाचे काळीज पिळवटलेतिने कोणालाही दोष देता आपल्या परिस्थितीला जवाबदार धरले आणी तिथून निघून गेलीगणु तसाच फणफणत सर्व पुड्या घेऊन बाहेर पडला.

हायवेवर ट्रॅफिक गच्च झाले होतेसर्व गाड्या मुंगीच्या चालीने चालल्या होत्याचालल्या काय बहुतेक थांबल्याच होत्यागणु थोडा सुखावला कारण त्याचा धंदा अशावेळी चांगलाच होतो

आताश्या बऱ्याच पुड्या विकल्या गेल्या होत्या आणी त्याचे लक्ष पुढच्या मर्सिडीज गाडीकडे गेलेत्या प्रशस्त गाडीत मागच्या सीटवर दोन लहान गोंडस मुले त्याला हात दाखवत बोलावत होती   दिसायला ती जुळी वाटत होतीवय साधारण सुहास एवढेच असावे. गणु लगबग त्या गाडीकडे गेलागाडीच्या ड्रायविंग सीटवर बसलेल्या त्या मुलांच्या वडिलांनी गणूकडे दोन पुड्या मागितल्या आणी गणूला २००० ची नोट देऊ केली.   गणू त्या दोन मुलांच्या हातात पुड्या देऊन लाजिरवाणे होत म्हणाला, " माझ्याजवळ कुठून एवढे सुट्टे पैसे येतील? एवढा धंदा नाही होत साहेब." गाडीवाल्याने खिसे तपासून बघितले तर त्याच्या जवळसुद्धा सुट्टे नव्हते.

मग आपल्या मुलांना म्हणाला, " चला पुड्या परत करा, आपण नंतर कधीतरी शेंगदाणे घेऊ."  मुलांच्या डोळ्यात टचकन पाणी आले, पुडी स्वतःजवळ गच्च पकडीत नाही असे मान हलवू लागली.   मुले ऐकत नाही हे बघून वडिलांचा पारा चढला, त्यांनी खचकन मुलांच्या हातातून पुड्या हिसकावल्या आणी गणूला दिल्या. मुलांचा हिरमोड झाला त्यांनी रडायला सुरुवात केलीवडील त्यांना दमदाटी करू लागले आणी ते अजूनच रडायला लागलेएवढ्यात सिग्नल सुटला आणी गाड्या हळू हळू पुढे सरकू लागल्यादोन्ही मुले एकदा आपल्या  वडिलांकडे तर एकदा मागे राहिलेल्या गणूकडे बघत मुसमुसत राहिली

गणु झटक्यात पुढे धावला आणी दोन पुड्या त्या मुलांच्या वडिलांना देऊ केल्याते म्हणाले, “अरे बाबा सुट्टे पैसे नाहीत, आम्हाला शेंगदाणे नकोत.’  तरीही गणूने दोन पुड्या गाडीत सरकावल्या आणी म्हणाला, “काही हरकत नाही, पैसे नंतर कधीही द्या पण मुलांना हे दाणे द्या.”

एवढ्यात गाडीने थोडा स्पीड पकडला. गाडी पुढे पुढे आणी गणु मागे मागे राहत गेला. ती दोन्ही मुले हातातले शेंगदाणे तोंडात कोंबत गणूला हात दाखवत टाटा करत होते.


थोड्या वेळाने मुले आणी गणू एकमेकांच्या दृष्टीतून हळू हळू धूसर होत गेले.