माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. शाळेत जाताना गोरेगांव रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या म्हशींच्या बाजारातून आम्ही मुले चालत जात असू. एके दिवशी बघितले तर तिकडे एक मोठी लॉरी उभी होती. तिच्या मागच्या उघड्या बाजूला एक रुंद लाकडाची फळी लावली होती. त्यावरून म्हशींना लॉरीवर चढवत होते. त्यांना दुसऱ्या बाजारात नेण्यात येत होते.
काही म्हशी शांतपणे फळीवरून चढत लॉरीमध्ये निमुटपणे जाऊन उभ्या राहत होत्या परंतु काही म्हशी फळीवर चढायला तयार नव्हत्या. त्यांना फळीवर चढवायला चार पाच भैये प्रवृत्त करत होते तरीसुद्धा त्या ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी भैयांनी त्यांच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. प्रथम त्यांना फळीवर ढकलू लागले पण म्हशी फळीच्या दोन्ही बाजूने खाली उतरू लागल्या. भैयांना ते सहन नाही झाले. दोन भैये फळीच्या दोन बाजूला उभे राहिले व जश्या म्हशी फळीच्या बाजूला सरकायच्या तसे ते हातातल्या काठीने त्यांना मारून ठुस्कावून परतवू लागले. म्हशींजवळ आता काही पर्याय उरला नव्हता. फळी वरून परत फिरले तर मागे दोन भैये, बाजूने पळायचा प्रयत्न केला तर दोन्ही बाजूला एक असे दोन भैय्ये उभे. म्हशी त्यांच्या माराला घाबरून शेवटी फळीच्या चौथ्या दिशेला म्हणजे लॉरीमध्ये जाऊ लागल्या.
सर्व म्हशी लॉरीत गेल्यावर चारही भैये विजयी मुद्रेने एकमेकाकडे बघू लागले. एकाने लॉरीचा मागचे फळकुट वर करून साखळीने घट्ट बांधून बंद केले व लॉरीवर एक काठी मारून, चालकाला निघायचा आदेश दिला. लॉरी त्या म्हशींना घेऊन निघाली. चारही भैय्ये आपल्या पराक्रमावर खुश होऊन, कपाळावरचा घाम फुसत, बाजूच्या चहाच्या टपरीवर जाऊन चहाचे भुरके मारत बसले.
मी त्या म्हशींची किंव करावी कि त्या भैय्यांच्या सफलतेचे कौतुक करावे ह्या संभ्रमात शाळेच्या दिशेने चालू लागलो.
काळ असाच पुढे सरकत गेला, वर्षानंतर वर्षे मागे पडू लागली. २००५ साली झालेल्या सार्वजनिक निवडणुकीनंतर कॉंग्रेसने समविचारी पक्षांचे गठबंधन करून सरकार सरकार स्थापन केले व अचानक भारताच्या उद्योगवृद्धी दराने चढती घौडदौड सुरू केली. बांधकाम उद्योगाने तर सर्वांनाच चकीत करून टाकले. घरांच्या किमती एक दोन वर्षातच तीन चार पट वाढल्या.
मला अजूनही स्पष्ट आठवते, माझा मित्र २००५ साली मुंबईत अंधेरीला एक घर घेत होता. साधारण २४ लाखाला त्याला ते मिळत होते परंतु त्याने २२ लाखाची तयारी दाखवली. घरमालकाने २४ चा आकडा तर माझ्या मित्राने २२ चा आकडा पकडून ठेवला व तो सौदा झालाच नाही. मित्राची नोकरीतून बदली झाली व तो पुढील दोन वर्षांसाठी इंग्लंडला निघून गेला. तो परतला तेव्हा त्याच घराचा भाव साठ लाख झाला होता. आता ते घर दोन लाखासाठी सोडाच तर पूर्णपणे त्याच्या आवाक्याबाहेर गेले होते.
पुढे २००८ साली जागतीक अर्थव्यवस्था अशी काही मंदीच्या खाईत पडली की आजमितीपर्यंत ती स्वतःला सावरू शकली नाही. भारताची अर्थव्यवस्था काही ह्याला अपवाद नव्हती, आपल्याकडेही बहुतेक सारेच उद्योग अजूनही मंदीचा सामना करत आहेत. देशातील विविध क्षेत्रातील विद्वान आपापल्यापरीने सरकाराला मंदीतून बाहेर पडण्याचे उपदेश देत आहेत परंतु परिस्थितीत काही जास्त फरक पडला नाही.
गेली दोन एक वर्षे गृहबांधकाम उद्योग, कमी विक्रीमुळे शांत पडला आहे. बिल्डर्स सतत सरकारला, ग्राहकांना घरे खरीदण्याचे प्रोत्साहन देणाऱ्या योजना बनविण्यासाठी साकडे घालत आहेत. त्यांच्या मते गृहकर्जे स्वस्त केली म्हणजेच त्यावरील व्याजदर कमी केला तर घरांची विक्री वाढेल. दुसरी एकसूचना गृहकर्जे देणाऱ्या संस्थांनी मांडली की गृहकर्ज परतफेडीवर व त्यावरील दिलेल्या व्याजावर आयकरात सूट दिली तर ग्राहकांना कर्जे घेण्यास प्रोत्साहन मिळेल.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही माणूस बिल्डर्सना घरांच्या किमती कमी करण्याचा उपदेश करत नव्हता. सर्वांच्या मते ह्या मंदीच्या रोगाचे मूळ कारण ग्राहकच होता. जिथपर्यंत तो घरे घेण्यासाठी पुढे येणार नव्हता तिथपर्यंत मंदी उठणार नव्हती. थोडक्यात जो काही इलाज करायचा तो म्हणजे ग्राहकाला जबरदस्ती ठुस्कून पुढे ढकलणे हाच होता. सगळ्याचा कहर म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपल्या वित्तमंत्र्यांनी एक विधान केले की बांधकाम उद्योग सध्या संकटातून जात आहे व त्यांना सरकारने मदत नाही केली तर तो मरून जाईल.
आणी मला म्हशींचा प्रसंग आठवला.
नजरे समोर चित्र उभे राहिले त्यात लॉरी म्हणजे बिल्डर्सचा आ वासलेला हावरा जबडा फळीच्या एका बाजूला बिल्डर्स तर दुसऱ्या बाजूला कर्जे देणाऱ्या संस्था व माठीमागे सरकार. फरक एकच होता तो म्हणजे फळीवर बुद्धीवादी ग्राहक होते. बुद्धी ग्राहकाला लॉरीत जाण्याची अनुमती देत नव्हती तर सरकार उघडपणे ग्राहकाला काठीने ठुसकण्याचे काम करू शकत नव्हते! फळीच्या दोन्ही बाजूचे कधी काकुळतीने तर कधी डोळे वटारून सरकारला खुणा करत होते की अरे बाबा जबरदस्तीने नाही तर गोंजारून तरी म्हशीला लॉरीत चढवा !!
No comments:
Post a Comment