Thursday, May 29, 2025

प्रिय आईस

पोटच्या मुलांना आभाळाएव्हढे प्रेम दिलंस

आमचे अश्रू स्वतःच्या डोळ्यात साठवलेस

परंतु आमचे डोळे ओले होऊ दिले नाहीस

स्वतः झिजलिस आणि आम्हाला फुलवलेस


वयोमानाने आता थकलीस तू, असे वाटते 

तरी डोळ्यातील माया अजून तशीच भासते 

मनातील प्रेमाचा जोश व शरीरातील ताकद 

दोघांचाही विरुद्ध दिशेने चालू आहे प्रवास


आजही समोर आल्यावर उत्साहाने उठतेस 

थोड्याच वेळाने ताकद नाही म्हणून बसतेस 

जेव्हा हे सर्व मी बघतो माझ्या डोळ्यासमोर

तेव्हा अनाहूत वाहू लागतात मनात अश्रू झरझर 


तुझ्याशिवाय जीवन, जणू एक रिकामे अवकाश 

तुझ्या अस्तित्वातच घडले माझे अस्तित्व सावकाश 

तुझ्या प्रेमाच्या रोपट्यातून फुललेले मी एक फुल 

पण मनात रोज फुलतं आई तुझ्याच कृतज्ञतेचं फूल


Sunday, May 4, 2025

असेच अचानक वादळ आलं

 

असेच अचानक वादळ आलं,

वृक्षाची एक फांदी कोलमडली.

फांदीवरचे आपलं घरटं थरारलं,

क्षणात सारी स्वप्ने भरकटली.

 

अंधाराने मला संपूर्ण घेरलं होतं.

आजूबाजूला चाचपडलं तर फक्त

माझी दोन बाळे मला बिलगून होती,

बाकी सारं दूरपर्यंत धुरसटच होतं

 

घरट्यातील पणतीची ज्योत विजली होती,

सारे बळ एकवटून एक दृढनिश्चय केला.

डगमगायचे नाही, हार नाही मानायची,

मनाशी चंग बांधला उजेड तेजत ठेवला.

 

बाळांनो, धीरगंभीर समस्या समोर होती,

नियती जणू काही माझी परीक्षा घेत होती.

निराधार होते तरी तुम्हाला आधार देता देता,

आपोआप स्वतःला आधार मिळत होता.

 

सबळ समर्थ स्वकीयांनी हात पुढे केला,

परिस्थितीशी झुंजत लढत मार्ग काढला.

वाटेत कधी गारवा तर कधी झळ लागली,

पण त्या चटक्यांपासून तुम्हाला दूर ठेवली.

 

स्वमेहनतीने तुम्ही आता सक्षम सबळ झालात,

पण वयोमानानुसार स्वकीय थोडे दुर्बळ होत आहेत.

कालपर्यंत त्यांनी दिलेल्या आधाराला ठेवून माझ्या लक्षात,

आज त्यांच्या आधाराची काठी बनणे हेच माझ्या ध्यानात.