गणू गडबडून
जागा झाला, घडाळ्यात बघितले तर
संध्याकाळचे सहा वाजले
होते. त्याला
बसल्या बसल्या कधी डोळा
लागला तेच कळले
नव्हते. दुपारी
दोन वाजता जेवण्याच्या
डब्ब्यांची डिलिव्हरी करून घरी
आला होता. भूक प्रचंड
लागली होती व त्यातच
सुगंधाने त्याच्या आवडीचे जेवण
बनवले होते. साहजीकच जेवण जरा
जास्त झाले.
त्याला
खाडकन जाग आली व पहिला
सुगंधावर खेकसला, “मला उठवले
का नाहीस तू?”
सुगंधा म्हणाली,
"अहो जरा तरी
तुमच्या शरीराला आराम
द्या. काल
रात्री अकरा वाजता
झोपलात आणी पहाटे
एक वाजता उठून
कंपनीत कामाला गेलात. आता
परत निघाल ते रात्री
अकरा वाजता परत
याल. मुद्दामच
मी तुम्हाला नाही
उठवले. किती
गाढ झोपला होता
तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावर
शांती दिसत होती.”
हे
ऐकून गणु अजूनच
चिडला. “एवढेसुद्धा
तुला कळत नाही? हायवेच्या
सिग्नलवर एवढ्याना ४ – ५ जण आलेसुद्धा
असतील. आता
मी पुड्या कधी
बांधणार, पोहोचणार कधी आणी विकणार कधी?
”
गणु
खूप मेहनती होता. घरची
परिस्थिती नाजूकच होती. शिक्षण
वडील गेल्यानंतर सोडावे
लागले होते. आईने हलकी
फुलकी कामे करावी हे त्याला मान्य
नव्हते. जे
हाताला मिळेल ते
छोटे मोठे काम तो
करू लागला . दिवसातून १६ - १८ तास काम
करायचा. काटकसर
करीत, एकएक पैसा
वाचवत आयुष्य रेटत
होता. पाच
वर्षापूर्वी त्याला मारुतीच्या
शोरूमवर गुरख्याची नोकरी
मिळाली होती. त्यानंतर एका वर्षात
त्याचे सुगंधाबरोबर लग्न
झाले आणी वर्षभरात
एक मुलगा झाला. सुहास
आता चार वर्षाचा
झाला होता, एकदम
गोंडस आणी चुणचुणीत
होता.
घर
खर्च वाढल्यामुळे गणूने
मुद्दामहून शेठजींकडे रात्रपाळी मागून
घेतली. रात्री
१ ते सकाळी
१०
तो शोरूमवर ड्युटी
करायचा. घरी आल्यावर
थोडावेळ झोपून लगेच
जेवणाचे डब्बे पोहोचवायला
जायचा तो दुपारी
२ वाजेपर्यंत परत
यायचा. मग
जेवून झोपल्यावर ४
च्या सुमारास उठून
खाऱ्या शेंगदाण्याच्या पुड्या
बांधून हायवेच्या सिग्नलवर
साधारण ५ वाजता पोहोचायचा. ऑफिसमधून
निघालेले चाकरमानी, सिग्नलला ट्रॅफिकमध्ये
गाडी अडकली असताना
टाइम पाससाठी शेंगदाणे
विकत घेतात. १० रुपयाला
एक पुडी. रात्री
९ वाजता परत
जेवणाचे डब्बे पोहोचवायला
तो मोकळा व्हायचा. असा
त्याचा खडतर जीवनक्रम!
आज
त्याला उशीर झाला
होता. त्याच्या
आधीच काही शेंगदाणे
विकणारे आले असणार
व आज धंदा कमी
होईल ह्या विचाराने
तो त्रस्त झाला.
सुगंधा
म्हणाली, ‘काही काळजी
करू नका, मी पुड्या बांधल्या
आहेत. सुहासनेसुद्धा
मदतीचा हात लावला
आहे.”
गणूचे
सुहासकडे लक्ष गेले
आणी बघतो तर काय सुहास
एका पुडीतील शेंगदाणे
तोंडात कोंबत होता, त्याच्या
चेहऱ्यावर तृप्तीचे भाव पसरले
होते. शेंगदाणे
कमी होत आहेत
ह्या विचाराने गणु
एकदम संतापला त्याने
सुहासच्या हातातून खचकन पुडी हिसकावून घेतली आणी म्हणाला,”एवढेसुद्धा कळत
नाही हे
दाणे विकण्यासाठी आहेत,
तुझ्या खाण्यासाठी नाहीत.”
अचानक
घरात शांतता पसरली. बिचाऱ्या
निरागस सुहासला काही
कळेना की त्याचे
काय चुकले, त्याच्या
चेहऱ्यावर हास्य लोपून
भीती दाटली. त्याचा कावरा
बावरा चेहरा बघून
सुगंधाचे काळीज पिळवटले. तिने
कोणालाही दोष न
देता आपल्या परिस्थितीला
जवाबदार धरले आणी
तिथून निघून गेली. गणु
तसाच फणफणत सर्व
पुड्या घेऊन बाहेर
पडला.
हायवेवर
ट्रॅफिक गच्च झाले
होते. सर्व
गाड्या मुंगीच्या चालीने
चालल्या होत्या. चालल्या काय बहुतेक
थांबल्याच होत्या. गणु
थोडा सुखावला कारण
त्याचा धंदा अशावेळी
चांगलाच होतो.
आताश्या
बऱ्याच पुड्या विकल्या
गेल्या होत्या आणी
त्याचे लक्ष पुढच्या
मर्सिडीज गाडीकडे गेले. त्या प्रशस्त
गाडीत मागच्या सीटवर
दोन लहान गोंडस
मुले त्याला हात
दाखवत बोलावत होती दिसायला
ती जुळी वाटत
होती. वय
साधारण सुहास एवढेच
असावे. गणु लगबग
त्या गाडीकडे गेला. गाडीच्या
ड्रायविंग सीटवर बसलेल्या
त्या मुलांच्या वडिलांनी
गणूकडे दोन पुड्या
मागितल्या आणी गणूला
२००० ची नोट देऊ केली. गणू
त्या दोन मुलांच्या
हातात पुड्या देऊन
लाजिरवाणे होत म्हणाला, " माझ्याजवळ कुठून एवढे सुट्टे पैसे येतील? एवढा
धंदा नाही होत साहेब." गाडीवाल्याने खिसे
तपासून बघितले तर
त्याच्या जवळसुद्धा सुट्टे नव्हते.
मग
आपल्या मुलांना म्हणाला, " चला पुड्या परत करा, आपण नंतर कधीतरी शेंगदाणे घेऊ." मुलांच्या डोळ्यात टचकन पाणी आले, पुडी स्वतःजवळ
गच्च पकडीत नाही असे मान हलवू लागली. मुले
ऐकत नाही हे बघून वडिलांचा पारा चढला, त्यांनी खचकन मुलांच्या हातातून पुड्या हिसकावल्या
आणी गणूला दिल्या. मुलांचा हिरमोड
झाला व त्यांनी
रडायला सुरुवात केली. वडील
त्यांना दमदाटी करू
लागले आणी ते अजूनच रडायला
लागले. एवढ्यात
सिग्नल सुटला आणी
गाड्या हळू हळू पुढे सरकू
लागल्या. दोन्ही
मुले एकदा आपल्या वडिलांकडे
तर एकदा मागे
राहिलेल्या गणूकडे बघत
मुसमुसत राहिली.
गणु
झटक्यात पुढे धावला
आणी दोन पुड्या
त्या मुलांच्या वडिलांना
देऊ केल्या. ते म्हणाले,
“अरे बाबा सुट्टे
पैसे नाहीत, आम्हाला
शेंगदाणे नकोत.’ तरीही
गणूने दोन पुड्या
गाडीत सरकावल्या आणी
म्हणाला, “काही हरकत
नाही, पैसे नंतर
कधीही द्या पण मुलांना हे दाणे द्या.”
एवढ्यात
गाडीने थोडा स्पीड
पकडला. गाडी पुढे
पुढे आणी गणु मागे मागे
राहत गेला. ती
दोन्ही मुले हातातले
शेंगदाणे तोंडात कोंबत
गणूला हात दाखवत
टाटा करत होते.
थोड्या
वेळाने मुले आणी
गणू एकमेकांच्या दृष्टीतून
हळू हळू धूसर होत
गेले.