Thursday, January 31, 2013

एक डिस्चार्ज  तसा आणी असाही


संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या एका जवळच्या मित्राला भेटायला एका हॉस्पिटलात गेलो होतो.

इमारतीत शिरत असतानाच समोरच्या दरवाजातून एक पुरुष आणी एक बाई बाहेर आली. पुरुष एक व्हील चेयर ढकलत होता. चेयर मध्ये एक म्हातारे आजोबा बसले होते. बरोबर असलेल्या बाईच्या हातात एक कापडाची थैली होती, त्यात आजोबांचे कपडे, ओषधे वगैरे दिसत होते. जवळच एक मोटार गाडी उभी होती त्यात आजोबांना हळुवार पणे बसवण्यात आले आणि तिघेही निघून गेले. तिघांच्याही चेहेऱ्यावर एक सुटकेचे समाधान दिसत होते.

साधारण अंदाज आला कि आजोबाना आज डिस्चार्ज मिळाला होता व त्यांनी एक सुटकेचा निश्वास टाकून घरचा रस्ता पकडला होता.

मनात असाच एक विचार आला कि त्या तिघांच्या ह्या क्षणी काय भावना असतील? नक्कीच एका संकटातून सही सलामत बाहेर पडल्या सारखे वाटत असावे!

थोडा वेळ माझ्या मित्राबरोबर मी बसलो, गप्पा मारल्या. वेळ असाच निघून गेला. साधारण रात्री ९ वाजता त्याचे जेवण झाले आणी दहाच्या सुमारे मी त्याला निरोप दिला. रात्रीच्या वेळी बाहेर जाण्यासाठी मागचा दरवाजा वापरावा असे वॉचमन म्हणाला आणी मी मागच्या बाजूला गेलो.

दरवाज्याजवळ पोहोचणारच होतो कि अचानक वातावरणात भकासपणा जाणवू लागला. समोरच्या जिन्यावरून पाच सहा माणसे शांतपणे उतरत होती. इतक्यात बाजूच्या लिफ्टमधून दोन नर्स आणी एक वार्डबॉय स्ट्रेचर ढकलत बाहेर आले. माझ्या काळजात चर्र झाले. सफेद चादरीने झाकलेले शव त्या स्ट्रेचरवर होते. कोणा एका माणसाचा मृत्यू झाला होता व ती सर्व माणसे त्या मृत व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलातून बाहेर जात होती.

मनात पुन्हा विचार आला ह्या व्यक्तीला हॉस्पिटलातून बाहेर निघताना काय वाटत असेल? त्याच्या चेहेर्यावरची प्रतिक्रिया काय असेल? पण आता तर त्याला काही भावनाच नाहीत!

परंतु हाहि एक डिस्चार्जच नव्हता का?